पेशावर : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका पत्रकाराची गोळ्या घालून हत्या केली आहे. खलिल जोरबान असे हत्या करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. खैबर न्यूज या पश्तू वृत्तवाहिनीसाठी ते काम करत होते. खैबर जिल्ह्यात मझिमा सल्तनखेल भागात घराजवळच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, असे आदिवासी पत्रकार संघटनेने म्हटले आहे.
या गोळीबारामध्ये साजिद नावाचा आणखीन एक जण जखमी झाला आहे. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला.मझिमा हा आदिवासी बहुल भाग असून या भागामध्ये दहशतवादी कारवाया खूप जास्त प्रमाणात होत असतात. जोरबान यांच्या हत्येच्या वृत्ताला त्यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. ही हत्या टार्गेटेड किलींग असल्याचा आरोप पत्रकारांच्या संघटनेने केला आहे.
खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमिन गंदापूर यांनी हत्येचा निषेध केला आहे आणि मारेकऱ्याना तात्काळ पकडण्याचे आदेश दिले आहेत. असोसिएशन ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया एडिटरने देखील या हत्येचा निषेध केला आहे आणि हल्लेखोराला अटक करण्याची मागणी केली आहे. खैबर युनियन ऑफ जर्नालिस्ट आणि पेशावर प्रेस क्लबनेही प्रांतीय सरकारला पत्रकारांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले.