पाकिस्तान विश्‍वासपात्र नाहीच! शांततेची बोलणी सुरू असतानाच पाकची शस्त्रास्त्रांची जमवाजमव?

इस्लामाबाद – गेल्याच आठवड्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात युध्दबंदी करण्याबाबत सहमती झाली आहे. मात्र पाकिस्तान हा देश विश्‍वासपात्र नाही असा सल्लाही संरक्षण तज्ञांनी दिला आहे. त्याचेच निदर्शक असलेला प्रकार पुन्हा एकदा समोर येतो आहे.

सध्या पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानने चर्चेतून मार्ग काढत सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चर्चेतून सीमेवरील परिस्थिती पुन्हा एकदा व्यवस्थित होईल अशी आशा आहे. मात्र, दुसरीकडे पाकिस्तानच्या काही हालचालींनी भारत सावधही आहे. 

भारताच्या गुप्तचर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान एकिकडे चर्चा करत आहे, तर दुसरीकडे सैन्याची शस्त्रास्त्रे वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुप्त माहितीनुसार, पाकिस्तानने सीमेवर असलेल्या सैन्याचे जुने रणगाडे, बंदुका यांची मार्चपर्यंत दुरुस्ती करण्याचे आदेश सैन्याला दिलेत.

या तयारी शिवाय पाकिस्तान बाहेरील देशांमधूनही मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र खरेदी करत आहे. ही खरेदी फास्ट ट्रॅक प्रणालीने करत आहे. या अंतर्गत पाकिस्तान आपल्या रणगाड्यांसाठी थर्मल इमेज तंत्रज्ञान खरेदी करत आहे.

यामुळे पाकिस्तानला रात्रीच्या अंधारातही आपल्या मोहिमा राबवता येणार आहेत. इतकेच नाही तर पाकिस्तानच्या सैन्याचे तिन्ही दल प्रमुख आपल्या सैनिकांशी विविध कार्यक्रमांमध्ये बोलताना युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन करत असल्याच्याही बातम्या आहेत. त्यामुळेच भारतानेही चर्चा करताना युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्याचीही तयारी ठेवली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कारगिल युध्दाच्या वेळीही पाकिस्तान सरकारवर अंतर्गत दबाव होता. विरोधकांनी तत्कालीन सरकारची पुरती कोंडी केली होती. लष्करावरही आरोप झाले होते. जेव्हा देशात अशी अशांतता निर्माण होते तेव्हा लक्ष विचलीत करण्यासाठी पाक लष्कराकडून काहीतरी अगोचरपणा केला जातो. आताही इम्रान खान सरकारच्या विरोधातील असंतोष शिगेला पोहोचला आहे. लष्करही विरोधकांच्या टीकेच्या केंद्र स्थानी आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कारगिलसारखेच काहीतरी दु:साहस केले जाण्याची शक्‍यता वर्तवली जाते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.