इस्लामाबाद – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियातील कझान येथे गेले आहेत. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. येथे ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेणार आहेत. चीन आणि पाकिस्तानचे घट्ट संबंध आहेत, त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ब्रिक्स दौऱ्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे.
पाकिस्तानी यूट्यूब चॅनल रियल एंटरटेनमेंट टीव्हीने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये पाकिस्तानी लोकांना पंतप्रधान मोदींच्या रशिया दौऱ्याबद्दल विचारण्यात आले. व्हिडिओमध्ये एक तरुणी असे म्हणताना ऐकू येते की, आज भारत ब्रिक्समध्ये रशियात पोहोचला आहे. तेथे पाकिस्तान सदस्य तर नाहीच, मात्र साधा निरिक्षकही नाही.
आपला शत्रू भारत, रशिया किंवा चीन नाही तर अज्ञान हा आपला शत्रु आहे. आज पंतप्रधान मोदींचे स्वागत कसे झाले ते पहा. आपले स्वागत आहे, असे खुद्द रशियाने म्हटले आहे. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, ही मोठी गोष्ट आहे की एका शक्तिशाली देशाला भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यात मैत्री हवी आहे.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट होणार आहे. ब्रिक्स परिषदेदरम्यान दोघांची भेट होईल. या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चीन आणि भारत यांच्यातील सीमावादासह अनेक बाबींवर संबंध चांगले राहिलेले नाहीत, अशा परिस्थितीत दोन्ही देशांच्या नेत्यांची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरते.
हे देखील महत्त्वाचे आहे कारण अलीकडेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त व्यवस्थेबाबत दोन्ही देशांदरम्यान एक करार झाला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी या बैठकीला दुजोरा दिला असून या बैठकीनंतर संयुक्त निवेदनही जारी करण्यात येणार असल्याचे सांगितले. 2019 मध्ये तामिळनाडूमध्ये द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी मोदींनी शी यांचे यजमानपद भूषवल्यानंतर पाच वर्षांनंतर दोन्ही देशांचे नेते भेटत आहेत.