अहमदाबाद – गुजरातच्या सागर किनाऱ्यावर भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून आलेली एक पाकिस्तानी बोट पकडण्यात आली आहे. त्यातील दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या बोटीचे नाव यासीन असे असून भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने शनिवारी रात्री ही बोट पकडली.ही बोट पोरबंदरला नेण्यात आली असून त्यातील दहा जणांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
भारतीय हद्दीत मादक द्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी अशा बोटींचा वापर केला जातो. तथापि या बोटीत काही मादक द्रव्ये सापडली किंवा कसे याची माहिती मात्र अजून मिळालेली नाही. यापुर्वी गुजरातच्या सागरी किनाऱ्यावर मादक द्रव्यांचा मोठा साठा घेऊन आलेल्या बोटी पकडण्यात आल्या होत्या. गेल्यावर्षी 20 डिसेंबरला अशाच एक बोटीतून चारशे कोटी रूपयांची मादक द्रव्ये पकडण्यात आली होती.