इस्लामाबाद – पाकिस्तानला 1.7 अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळवून देण्यासाठी आयएमएफला आवाहन करावे, अशी विनंती पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी अमेरिकेच्या उपपरराष्ट्र मंत्री वेंडी शर्मन यांच्याशी चर्चा करताना केली होती. या संवादाला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.
पाकिस्तान सरकार आणि लष्कराला जनरल बाजवा आणि शर्मन यांच्यातील संभाषण गुप्त ठेवायचे होते. परंतु एका पत्रकाराने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी लीक केली. यावरून माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी बाजवा आणि शर्मन यांच्या संभाषणाची खिल्ली उडवली.
इम्रान खान म्हणाले, जनरल बाजवा एवढेच सांगा की जर अमेरिकेने आम्हाला एमआयएफकडून कर्ज मिळवून देण्यासाठी मदत केली तर त्या बदल्यात पाकिस्तान त्यांना काय देईल. या कराराच्या बदल्यात पाकिस्तानच्या सुरक्षेशी खेळले जात असल्याचा आरोप खान यांनी लष्कराचे नाव न घेता केला.
खान म्हणाले, जेव्हा लष्कर पंतप्रधानांऐवजी कोणत्याही देशाकडे मदत मागते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण दिवाळखोरीत निघालो आहोत. आता सार्वत्रिक निवडणूक हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.