लाहोर – पाकिस्तानात लाहोर जवळील महामार्गावर एका महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर देशात संतापाचे वातावरण आहे. या महिलेच्या मुलासमोरच तिच्यावर कारमध्ये अत्याचार करण्यात आले.
दरम्यान, ही संतापजनक घटना घडल्यावरही महिलेने त्या ठिकाणी जायला नको होते, असे धक्कादायक विधान पोलीस दलाच्या प्रमुखांनी केल्यामुळे संतापात भरच पडली. त्याविरूध्द निदर्शने सुरू असून पोलीस प्रमुखांना तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, वाढता प्रक्षोभ ध्यानात घेत पंतप्रधान इम्रान खान यांनी वक्तव्य केले आहे. आपण या घटनेची गंभीर दखल घेतली असून अशा कृत्यांना सभ्य समाजात मुळीच स्थान देता येउ शकत नाही. आरोपींना ताबडतोब पकडण्यात यावे असे आदेश आपण दिले असल्याचे त्यांनी ट्वीटरवर म्हटले आहे.
संबंधित महिला लाहोर शहराजवळीत प्रमुख महामार्गावरून जात असताना त्यांची कार अचानक बंद पडली. त्याचवेळी दहा ते पंधरा जणांच्या जमावाने कारच्या काचा फोडत तिच्यावर हल्ला केला व या महिलेच्या मुलाच्या समोरच तिच्यावर बलात्कार केला. या धक्कादायक घटनेनंतर संतापाचे वातावरण असताना पोलीस विभागाचे प्रमुख उमर शेख यांच्या विधानाने आगीत तेल ओतण्याचेच काम केले. रात्रीच्या वेळी त्या महिलेने तिकडे जायला नको होते, असे विधान त्यांनी केल्यावर लाहोरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले.
दरम्यान, त्या महिलेचे संरक्षण करण्यात पोलीस अपयशी ठरले असल्यामुळे अगोदर त्यांनी माफी मागावी आणि उमर शेख यांच्या सारख्या व्यक्तींना अशा पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया खादीजा सिद्दीकी नामक कार्यकर्ता महिलेने अल जझीरा या वाहिनीशी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात 15 जणांना अटक केली आहे. मात्र त्यांच्यापैकी कोणीही गुन्ह्यात सहभागी नसल्याचे पोलीस सूत्रांचेच म्हणणे आहे.