इस्लामाबाद, दि. 25 – भारतात कोविडचे संकट अधिक गडद झाल्याने आता पाकिस्ताननेही भारताला मदत देऊ केली आहे. व्हेंटिलेटर्ससह सर्व गरजेच्या वस्तू पुरवण्याची आमची तयारी आहे, असे त्यांच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. या संबंधातील बाबी जशा निश्चित केल्या जातील त्यानुसार भारताला ही मदत पाठवली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
डिजिटल एक्सरे मशिन्स, पीपीई किट्स आणि तद्अनुषंगिक सामग्री आम्ही भारताला देऊ शकतो, असे पाकिस्तानने म्हटले आहे. दोन्ही देशांतील अधिकाऱ्यांनी आपसात चर्चा करून या मदतीच्या संबंधातील तपशील निश्चित करावा आणि करोनाचे आव्हान पेलण्यासाठी आणखीही जे सहकार्य आमच्याकडून भारताला अपेक्षित आहे ते सहकार्य आम्ही त्यांना देऊ करू, असेही पाकिस्तान विदेश मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भारतातील स्थितीबाबत चिंता व्यक्त करून पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविषयी सहानुभूती व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने हे निवेदन जारी करून भारताला मदतीची तयारी दर्शवली आहे. अनेक पाकिस्तानी नागरिकांनी आणि सेलिब्रेटीजनी ट्विटरवर भारतीय लोकांवरील हे संकट त्वरित दूर होवो, अशी प्रार्थना करून भारतवासियांविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तान सरकारने भारताला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले आहे.