इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाची राजधानी इस्लामाबाद येथे मोठा मोर्चा काढण्याचा आपला इरादा बोलून दाखवल्याच्या पार्श्वभूमीवर “त्यांनी जर तसे केले तर पाकिस्तान सरकार त्यांना उलटे टांगेल. ( Pakistan government will hang former Prime Minister Imran Khan upside down if he launches his long march in Islamabad, warned Minister Rana Sanaullah Khan ) पाकिस्तान सरकारची त्यांच्यासाठी आता काय योजना आहे याची त्यांना कल्पना नाही” असा इशारा पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह खान यांनी दिला आहे.
पाकिस्तानच्या जिओ न्यूजने गृहमंत्र्यांच्याच हवाल्याने हे वृत्त दिले आहे. गर्दीसमोर आम्ही म्हणजे सरकार कोणाच्याही सुरक्षेची हमी देणार नाही, असा गर्भित इशाराही सनाउल्लाह यांनी दिला आहे.
जर एक सशस्त्र जमाव राजधानीत येत असेल तर त्यांच्यातले कोणीही काही करू शकते. अशा स्थितीत कोणाच्या सुरक्षेची हमी कशी दिली जाऊ शकते असे ते म्हणाले. मात्र, इम्रान यांच्या पक्षाच्या इस्लामाबादवर धडकणाऱ्या मोर्चाचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान सरकारने काय रणनीती तयार केली आहे यावर त्यांनी भाष्य केले नाही.
तथापि, आम्ही आता जे पाऊल उचलू त्यामुळे सरकार चकित होईल असे इम्रान खान यांनी अगोदर म्हटले असल्यामुळे पाकिस्तान सरकारमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच गृहमंत्र्यांनी आज धमकीवजा इशारे दिले आहे. थेट माजी पंतप्रधानांना उलटे टांगण्याची भाषा त्यांनी वापरली आहे.