इस्लामाबाद : इम्रान खान यांचे निकटचे साथीदार आणि पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ पार्टीचे नेते फवाद चौधरी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपण तूर्तास राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. इम्रान खान यांना 9 मे रोजी अटक झाल्यानंतर देशभर उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी “पीटीआय’च्या ज्या नेत्यांना अटक केली गेली होती, त्यामध्ये फवाद चौधरी यांचाही समावेश होता.
इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर झालेल्या हिंसक आंदोलनावर आपण आगोदरच टीका केली होती. आता काही काळ राजकारणापासून दूर राहायचे असल्याचे आपण म्हटलो होतो, त्यानुसार आपण पक्षाचा राजीनामा देत आहोत, असे फवाद चौधरी म्हणाले.
इस्लामाबाद पोलिसांनी फवाद चौधरी यांना 1 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातून अटक केली होती आणि त्यांची रवानगी पोलीस सचिवालयामध्ये करण्यात आली होती. देशातील वकील समुदाय कमकुवत झाला आहे. देशात कोठेही, कधीही याचिकाकर्त्याला अशाप्रकारे अटक केली गेलेली नाही, असे फवाद चौधरी यांनी सांगितले होते. पक्षाच्या नेत्या शिरीन मझारी यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे.
असाद उमर यांचाही राजीनामा
पीटीआय पक्षाचे सरचिटणीस असाद उमर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. असाद उमर हे पक्षाचे सरचिटणीस आणि आर्थिक विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाची आर्थिक घडी विस्कळीत होणार असल्यामुळे इम्रान खान यांच्यासाठी हा आणखीन एक मोठा धक्का आहे. आपण पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा देत असल्याचे असाद उमर यांनी काल अदियाला तुरुंगातून सुटका झाल्यानंतर लगेचच जाहीर केले. आपण कोणाच्याही दबावामुळे हा राजीनामा देत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले