इस्लामाबाद : शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर आणि त्यांना देश सोडावे लागल्यानंतर पाकिस्तानातील काही नामवंत मंडळींना हर्षवायु झाला आहे. पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी बांगलादेशच्या आडून भारतावरच निशाणा साधला आहे. त्यांनी चक्क एक व्हिडिओ जारी करून या घटनेबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यात त्यांनी बांगलादेशच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.
आपल्या व्हिडिओत बासित पुढे म्हणतात की शेख हसीना पळून भारतात पोहोचल्या असतील किंवा पोहोचतील. मात्र यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत अडचणीत येणार आहे. कारण त्यांनीच असे म्हणणे सुरू केले होते की बांगलादेशात जे काही सुरू आहे त्यात पाकिस्तानचा हात आहे.पाकिस्तानच बांगलादेशातील विरोधी पक्षांना पाठिंबा देतो आहे. मात्र मी असे म्हणतो की जोपर्यंत जनता तुमच्यासोबत नसते तोपर्यंत कोणताही पाठिंबा तुम्हाला उपयोगाला येत नाही. हसीना यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला असता तर ३०० जणांचे प्राण वाचले असते.
हसीना यांनी बांगलादेशला भारताचा सॅटेलाइट देश बनवले आहे. त्या भारत खेळवेल तशा खेळत राहील्या. पाकिस्तानने त्यांच्यापुढे मैत्रीसाठी हात केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. पाकिस्तानबाबत त्यांच्या मनात असलेल्या द्वेषामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत कायमच अडथळा निर्माण केला. आता पाकिस्तान बांगलादेशातील नवीन सरकारचे स्वागत करेल.
दरम्यान, एकीकडे पाकिस्तान हसीना यांच्या जाण्यामुळे जल्लोष करतो आहे तर दुसरीकडे भारत शोक व्यक्त करतो आहे अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी पत्रकार वजाहत काजमी यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे संरक्षण तज्ज्ञ कमर चीमा यांनीही या घटनेबाबत आनंद व्यक्त करताना म्हटले आहे की शेख हसीना यांच्या राजकीय खेळीचा अत्यंत वाईट पध्दतीने अंत झाला आहे. त्या निरंकुश नेत्या बनल्या होत्या. पाकिस्तानातील इतर माध्यमांनी हसीना यांच्या १५ वर्षांच्या राजवटीला हुकुमशाहीची राजवट असे संबोधले आहे.