खैबर पख्तूनख्वा – पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात पाकिस्तानी सुरक्षा दलांनी १० दहशतवाद्यांना ठार केले आहे. गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांवर कारवाई सुरू केली. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या अर्थात आयएसपीआरच्या हवाल्याने जिओ न्यूजने ही माहिती दिली आहे.
दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि काही वेळातच चकमक सुरू झाली. सुरक्षा दलांनी सर्व दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. चकमकीत लष्कराचे २४ वर्षीय कॅप्टन हसनैन अख्तर यांचाही मृत्यू झाला आहे.
ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याची माहिती आयएसपीआरने दिली. हे सर्वजण अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते. या दहशतवाद्यांनी अनेक निष्पाप लोकांची हत्याही केली आहे.
आयएसपीआरने सांगितले की, परिसरात उपस्थित असलेल्या उर्वरित दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सफाया करण्याची मोहीम देखील सुरू केली जाईल. देशाचे सुरक्षा दल दहशतवाद संपवण्यासाठी कटिबद्ध आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
पाकिस्तानातील जीओ न्यूजच्या वृत्तानुसार जानेवारी २०२५ मध्ये देशात दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली. ही वाढ गेल्या महिन्यापेक्षा ४२% जास्त आहे.