Pakistan Election Violence : पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोर एकामागून एक दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचा घटनाक्रम सुरूच आहे. त्याच क्रमवारीत इस्लामाबादमध्ये सुन्नी उलेमा कौन्सिल (SUC) नेते मौलाना मसूद उर रहमान उस्मानी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानच्या माध्यमानुसार, पोलिसांनी या घटनेबाबत सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात सशस्त्र लोकांनी सुन्नी उलेमा कौन्सिलचे उपमहासचिव मसूद उस्मानी यांच्या कारवर गोळीबार केला. ज्यात ते गंभीर जखमी झाले. उस्मानी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसराची नाकेबंदी केली. संशयितांच्या अटकेसाठी तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादच्या गौरी टाऊनमध्ये उस्मानी यांच्यावर दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. वृत्तानुसार, बंदूकधाऱ्यांनी उस्मानी यांची कार थांबवली, त्यांच्यावर गोळीबार केला आणि पळून गेले. या हल्ल्यात उस्मानी यांच्या ड्रायव्हरलाही गोळ्या लागल्या आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.
आयजीपी इस्लामाबाद डॉ. अकबर नसीर यांनी सांगितले की, पोलिसांनी तपास सुरू केला असून तपासासाठी वेगवेगळी पथके पाठवली आहेत. मसूदच्या मृत्यूची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने घेतलेली नाही. दरम्यान, पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहेत, त्यामुळे शेजारील देशात हिंसाचारात वाढ झाली आहे. उत्तर वझिरीस्तानमध्ये माजी नॅशनल असेंब्ली सदस्य आणि नॅशनल डेमोक्रेटिक मुव्हमेंट (NDM) नेते मोहसिन दावर यांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवसांनंतर ही घटना घडली आहे. याआधी काही दिवसांपूर्वी खैबर पख्तूनख्वामधील डेरा इस्माईल खानमध्ये जमियत उलेमा-ए-इस्लाम-फजल (जेयूआय-एफ)चे सुप्रिमो मौलाना फजलुर रहमान यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला होता.