इस्लामाबाद – गिलगीट बाल्टिस्तान भागातील प्रत्यक्ष ताबारेषेवर दोन भारतीय गुप्तहेरांना पकडण्यात आल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला आहे. त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे वृत्त पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिले आहे.
डॉनने दिलेल्या वृत्तानुसार त्या दोघांकडून भारतीय चलनातील नोटा, ओळखपत्र आणि अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. लष्कराने त्यांना पोलिसांच्या हवाली केल्यानंतर गिलगीटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजा मिर्झा हसन यांनी त्यांना प्रसार माध्यमांपुढे हजर केले. मिर्झा यांनी सांगितले की हे दोन्ही इसम काश्मीरचे रहिवासी असून त्यांना जबरदस्तीने हेरगिरी करण्यासाठी भारताने पाकिस्तानी हद्दीत घुसवले होते. त्यांनी प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडल्यानंतर त्यांना लगेच अटक करण्यात आली. नूर महंमद वाणी आणि फिरोज अहमद लोणे अशी त्यांची नावे आहेत असेही मिर्झा यांनी सांगितले. ते गुरेझ सेक्टरमधील अचोरा गावचे रहिवासी आहेत असेही त्यांचे म्हणणे आहे.