नवी दिल्ली – न्यूझीलंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी चक्क पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने बॅटिंग केली आहे. कारकिर्दीत 70 शतके फटकावणाऱ्या कोहलीच्या दर्जाबद्दल लगेच शंका का घेता असा सवालही इंझमामने केला आहे.
एखाद्या मालिकेत बॅडपॅच आलेला कोहली हा काही एकमेव फलंदाज नाही. जागतिक क्रिकेटमध्ये सर डॉन ब्रॅडमन वगळता अनेक दिग्गज खेळाडूंना बॅडपॅच आलेला आहे. सातत्य कदाचित एखाद्या वेळी टिकत नाही मात्र दर्जा कायम राहतो ही क्रिकेटमधील उक्ती आहे, त्याचाच धागा पकडत इंझमामने येत्या काही दिवसांत कठोर सराव करून कोहली पुन्हा एकदा वर्चस्व गाजवेल असा विश्वासही इंझमामने व्यक्त केला.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन्ही कसोटीतील डाव पाहता कोहलीने 2, 19, 3 व 14 अशा एकूण केवळ 38 धावा केल्या. अनेक समीक्षक कोहलीच्या खराब कामगिरीबाबत बोलत आहेत, मात्र ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके फटकावली आहत, त्याच्या गुणवत्तेवर शंका कशी घेतली जाऊ शकते. प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला अपयश येते, एकाग्रतेने खेळाडू देखील यश मिळत नाही. अपयशाचीही एक वेळ येते व निघूनही जाते. मात्र, याच काळात खेळाडूला मानसिक पाठिंब्याची गरज असते, कोहलीबाबत बोलायचे झाले तर तो येत्या काळात या गर्तेतून निश्चितच बाहेर येईल व पुन्हा एकदा मैदान गाजवेल, असा विश्वासही इंझमामने व्यक्त केला.