इस्लामाबाद – बलुचिस्तानमध्ये फुटीरतावादी सशस्त्र गटांनी पाकिस्तानी सैन्याविरुद्ध उघड युद्ध पुकारले आहे, तर खैबर पख्तूनख्वामध्ये टीटीपीच्या हल्ल्यांनी पाकिस्तानी लष्कर गांगरले आहे. लष्कराविरूध्द लढणाऱ्या बंडखोरांच्या गटांनी केलेल्या दाव्यांनुसार गेल्या दोन आठवड्यात झालेल्या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. त्यामुळे बलाढ्य लष्कर म्हणून मिरवणाऱ्या पाक लष्कराची बरीच नाचक्की देशांतर्गत झाली आहे.
लागोपाठ होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी एक विधान केले आहे. पाकिस्तानला एक कठोर राज्य बनवण्याची गरज आहे असे त्यांनी म्हटले आहे. या सर्व घडामोडींमध्ये, एका पाकिस्तानी तज्ज्ञाने भारताबद्दल मोठा दावा केला आहे.
पाकिस्तान कसा अडचणीत अडकला आहे हे वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार नजम सेठी यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यांनी म्हटले की परिस्थिती अशी आहे की भविष्यात पाकिस्तानी सैन्याला शांततेसाठी भारतासोबत तडजोड करावी लागू शकते. याचवेळी नजम सेठी यांनी २०१९ बद्दलही एक मोठा दावा केला आणि म्हटले की त्यावेळी पाकिस्तानी सैन्याला भारतासोबत शांतता हवी होती पण तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यामध्ये अडथळा ठरले.
जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला फार वाढवले जाऊ नये अशी त्यावेळी पाकिस्तानी सैन्याची भूमिका होती. त्या काळात पाकिस्तानी कॉर्प्स कमांडर्सच्या बैठकीतही यावर एकमत झाले. मात्र या सगळ्यानंतर इम्रान खान यांनी प्रकरण आणखी चिघळवले आणि संसदेत जाऊन भारताविरुद्ध विधान केले. एवढेच नाही तर त्यांनी भारतातील राजदूतांना परत बोलावण्याची आणि व्यापार थांबवण्याची घोषणाही केली असा दावा सेठी यांनी केला.
भारत बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप आज पाकिस्तानने केला आहे, परंतु उद्या त्यांना भारतासोबत वाटाघाटीच्या टेबलावर बसावे लागू शकते असे नमूद करून नजम सेठी म्हणाले की जर पाकिस्तानने अफगाणिस्तानात लष्करी कारवाई सुरू केली आणि भारताने नियंत्रण रेषेवर मोर्चा उघडला तर मोठी समस्या निर्माण होईल आणि ही परिस्थिती पाकिस्तानसाठी आणखी अवघड होईल.