-->

कर्जाच्या बोज्याखाली दबला पाकिस्तान; जीनांच्या बहीणीच्या नावे असलेले पार्क ठेवणार ‘गहाण’

इस्लामाबाद – आर्थिक दिवाळखोरीचा समना करत असलेल्या पाकिस्तानची दयनीय अवस्था संपूर्ण जगासमोर आहे. चीन, संयुक्त अरब अमिरात, मलेशिया आदी अनेक देशांकडून पाकिस्तानने मोठी कर्जे घेतली असून ती फेडण्याची ताकद आता त्या देशात उरलेली नाही. नवी कर्जे देण्यास कोणी तयार नाही. ज्या देशांकडून अगोदर कर्ज घेतले आहे त्यांनी परतफेडीसाठी तगादा लावला असल्यामुळे त्या देशातील इम्रान खान सरकारसमोर मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानातील सगळ्यांत मोठे पार्क गहाण ठेवण्याचा व त्याद्वारे 500 अब्ज रूपये उभे करण्याचा निर्णय इम्रान सरकारने घेतला असल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानचे प्रणेते मोहम्मद अली जीना यांच्या भगिनी मादर ए मिल्लत (मदर ऑफ नेशन) फातिमा जीना यांच्या नावाने हे पार्क असून त्याचे क्षेत्र 759 एकर आहे. पाकिस्तानातील हा सगळ्यांत हिरवळीचा भाग मानला जातो. पाक माध्यमांच्या बातम्यांनुसार हा पार्क गहाण ठेवण्याचा प्रस्ताव व्हिडीओ लींकद्वारे घेतल्या जाणाऱ्या बैठकीत मांडला जाणार आहे.

इस्लामाबादेतील राजधानी विकास प्राधिकरणाकडून अगोदरच यासंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात आले आहे. पाकिस्तानातील या अगोदरच्या सरकारांनी अशा अनेक मालमत्ता आणि जागा यापूर्वीही गहाण ठेवल्या आहेत व त्याद्वारे पैसा उभा केला आहे. मात्र खुद्द जीना यांच्या भगिनींच्या नावाने असलेली मालमत्ता गहाण ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून सरकारचे नेतृत्व करणाऱ्या इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या सध्याच्या या दिवाळखोर अवस्थेसाठी त्या देशातील अगोदरच्या सरकारांना बोल लावला आहे. स्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही सरकारला उठाठेव करावी लागते आहे.

सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात यांनी पाकिस्तानला कायम कर्जरूपी मदत केली आहे. मात्र आता नवे कर्ज देण्याअगोदर या देशांनी जुनी कर्जे परत देण्याचा तगादा लावला आहे. पाकिस्तानचा सदाबहार मित्र चीननेही आता कर्ज देण्यापासून हात अखडता घेतला आहे.

गेल्या काही वर्षात पाकिस्तान आणि मलेशिया यांच्यात मैत्रीचे कथित पर्व सुरू झाले होते. आता पाकची गरीबी पाहून मलेशियानेही पाकपासून अंतर राखायला सुरूवात केली आहे. त्याचा नमूना काही दिवसांपूर्वीच पहायला मिळाला. पैसे थकवल्यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे एक विमानच मलेशियाने प्रवाशांना खाली उतरवून जप्त करून घेतले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.