इस्लामाबाद – पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाजवा यांनी भारत आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरच्या सैन्याला प्रत्यक्ष कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. भू राजकीय वातावरणाचा विचार करून या सज्जतेचे आदेश देण्यात आले आहेत, असे जन. बाजवा यांनी सांगितले.
रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयामध्ये झालेल्या 78 व्या कमांडर फॉर्मेशन कॉनफरन्सला संबोधित करताना मंगळवारी जन. बाजवा यांनी ही माहिती दिली. या परिषदेला देशातील सर्व कॉर्प्स कमांडर, प्रमुख लष्करी अधिकारी आणि सर्व फॉर्मेशनचे कमांडर उपस्थित होते.
सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भू संरक्षण परिस्थितीचा आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचाही आढावा घेतला आहे. त्याबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर लष्करी साधन सामग्रीच्या आधुनिकीकरणाबाबतही यावेळी माहिती देण्यात आली, असे पाकिस्तानच्या लष्करी प्रसिद्धी माध्यम विभागाने सांगितले.
गेल्या महिन्यात पाकिस्तान सैन्याने अफगाण सीमा हद्दीतून नुकत्याच झालेल्या गोळीबारांच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली होती. अफगाणिस्तानातून नुकत्याच झालेल्या सीमापार गोळीबारांच्या घटनांची आणि सीमापलीकडील भागात दहशतवादी गट पुन्हा सक्रिय होत असल्याची गंभीर दखल घेत अफगाणिस्तानच्या भूमीचा पाकिस्तानविरोधात वापर होऊ न देण्याचे धोरण या वेळी स्वीकारण्यात आले.