लाहोर – पाकिस्तानमधील लाहोर शहरात झालेल्या बॉम्बस्फोटमुळे एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात आतापर्यंत 3 जण ठार झाले असून 20 पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या स्फोटामुळे सध्या एकच खळबळ उडाली असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. लाहोरमध्ये मध्यवर्ती भागील अनारकली बाजारात हा स्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या स्फोटामुळे दीड फूट खोल खड्डा जमिनीत पडला होता. त्यामुळे या स्फोटाची भीषणता किती असेल, याची कल्पना येऊ शकते, असे पोलिसांनी म्हटले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यामुळे आजूबाजूची घरं आणि दुकानांच्या काचा फुटल्या. तसेच रस्त्यावर उभ्या असणाऱ्या अनेक वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
स्फोट झाल्यानंतर काही तासांतच तिघांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची पाकिस्तानने पुष्टी केल्याचे “डॉन न्यूज’च्या बातमीत म्हटले आहे. मात्र हा स्फोट अधिक शक्तीशाली होता आणि काही तासांनंतरच या घटनेचं खरं स्वरूप आणि गांभीर्य समजू शकेल, अशी माहिती पोलीस अधिकारी राणा रफी यांनी दिली. या स्फोटात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले असून यात काही मुलांचा देखील समावेश आहे. या जखमींमधील अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या स्फोटांमागे तरहीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेचा हात असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या स्फोटाची अद्याप कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही.