Pakistan Blasphemy Case । पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा कट्टरतावाद्यांची ‘दहशत’ पाहायला मिळाला आहे. कारण याठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या ईशनिंदा निर्णयाच्या निषेधार्थ शेकडो कट्टरपंथी चक्क न्यायालयात दाखल झाल्याची घटना घडली आहे. पाकिस्तानचे सरन्यायाधीश काझी फैज इसा यांनी एका अहमदिया व्यक्तीला ईशनिंदेच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. त्यामुळे कट्टरतावादी इतके संतप्त झाले की त्यांनी सरन्यायाधीशांच्या शीर कलम करण्यासाठी एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले. ही घटना सोमवारी घडली असली तरी आता कोर्टात घुसल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘अलमी मजलिस तहफुज-ए-नबुवत’ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निदर्शने करत होते. जमात-ए-इस्लामी आणि जमीयत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआयएफ) चे नेते तहफुज-ए-नबुवतसह निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. सरन्यायाधीश फैज इसा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि न्यायालयाने निर्णय मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. कोर्टात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी पोलिसांना पाण्याच्या तोफा, अश्रुधुराचा आणि लाठीचार्ज करावा लागला.
पाकिस्तानात खळबळ उडण्याचे कारण ? Pakistan Blasphemy Case ।
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये झालेल्या गोंधळामागील एक अहमदिया व्यक्ती आहे, ज्याचे नाव मुबारक अहमद सानी आहे. 2019 मध्ये, सानी यांनी एका महाविद्यालयात अहमदिया समुदायाशी संबंधित ‘एफसीर-ए-सगीर’ या धार्मिक पुस्तकाचे वितरण केले. या पुस्तकात अहमदिया पंथाचे संस्थापक यांचे पुत्र मिर्झा बशीर अहमद यांनी कुराणचा त्यांच्या पद्धतीने अर्थ लावला आहे. पुस्तक खूप वादग्रस्त मानले जाते. चार वर्षांनंतर 7 जानेवारी 2023 रोजी सानी यांना पुस्तक वाटल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
Radical Islamists attacking #Pakistan #SupremeCourt as part of protest against Chief Justice #Qazi Faez Isa who has been accused of #blasphemy. These were the scenes a few hours back. It threatens to worsen. A reward of Rs 1 cr (Pakistani) has been announced for killing him. pic.twitter.com/gV0wh2D9N7
— Ajay Kaul (@AjayKauljourno) August 19, 2024
येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुबारक सानी यांना कुराण (मुद्रण आणि रेकॉर्डिंग) (सुधारणा) कायदा, 2021 अंतर्गत अटक करण्यात आली. सानी यांनी आपल्या अटकेला न्यायालयात आव्हान दिले आणि असा युक्तिवाद केला की, ज्या कायद्यानुसार त्यांना अटक करून शिक्षा सुनावण्यात आली तो कायदा त्यांनी पुस्तकांचे वाटप करताना अस्तित्वात नव्हता. त्यावेळी आपण आपल्या धर्माचा प्रचार करण्यास मोकळे असल्याचे सानी यांनी सांगितले. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याची सुटका झाली. यावरून वाद सुरू झाला.
कट्टरपंथीयांचा न्यायालयाचा निषेध Pakistan Blasphemy Case ।
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जुलैमध्ये आंदोलन सुरू झाले, जेव्हा तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) ने हा मुद्दा उपस्थित केला. वाद अधिक गडद होत असल्याचे पाहून सुप्रीम कोर्टाने या निर्णयावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, अहमदींना स्वतःला मुस्लिम म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. ते त्यांच्या मशिदींमध्येच धर्माचा प्रचार करू शकतात. मात्र न्यायालयाने दिलेला निर्णय पूर्णपणे योग्य आहे. 2021 पूर्वी मुबारक सानीने केलेल्या गुन्ह्यासाठी कोणतीही शिक्षा नव्हती, त्यामुळे त्याला शिक्षा होऊ शकत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्टीकरणामुळे कट्टरपंथी संतापले
त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर स्पष्टीकरण दिल्यानंतर कट्टरपंथी आणखीनच संतप्त झाले. ते म्हणाले की अहमदी मुस्लिम नसल्यामुळे त्यांना मशिदीतही धर्माचा प्रचार करण्याची परवानगी नाही. त्यांनी असे केल्यास कुराण, इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांचा थेट अपमान केला जात आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयावर फेरविचार न केल्यास राजधानीत खळबळ उडेल, असा इशारा JUIF नेते मौलाना अब्दुल गफूर हैदरी यांनी दिला.
दुसरीकडे, तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) नेते अमीर पीर जहीर-उल-हसन शाह यांनी सरन्यायाधीशांच्या विरोधात फतवा जारी केला. एवढेच नाही तर त्याचा खून करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले. सध्या पोलिसांनी शेकडो टीएलपी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.