इस्लामाबाद : रोखीच्या संकटात अडकलेल्या पाकिस्तानने पुन्हा एकदा चीनकडे हात पुढे केले आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानने आता चीनकडून 1.4 अब्ज अमेरिकन डॉलर (10 अब्ज युआन) कर्ज मागितले आहे. तर पाकिस्तानचे चीनवर आधीच ४.३ अब्ज डॉलर (३० अब्ज युआन) कर्ज आहे.
वॉशिंग्टनमध्ये झालेल्या इंटरनॅशनल माॅनिटरी फंड अर्थात आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीदरम्यान, पाकिस्तानचे अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी चीनचे उप अर्थमंत्री लियाओ मिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान, चलन विनिमय कराराच्या अंतर्गत मर्यादा 40 अब्ज युआन अब्जपर्यंत वाढवण्याची विनंती केली.
याआधीही पाकिस्तानने चीनकडून कर्जाची मर्यादा वाढवण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र चीनने त्यांची मागणी फेटाळून लावली. फक्त दोन आठवड्यांपूर्वी, चीनने पुढील तीन वर्षांसाठी 4.3 अब्ज यूएस डॉलर (30 अब्ज युआन) कर्ज मर्यादा वाढवली. चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान आणि चीनमध्ये चलन अदलाबदलीचा करार झाला होता. यानंतर पाकिस्तानची कर्ज परतफेडीची मुदत 2027 पर्यंत वाढवण्यात आली.
26.48 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे
पाकिस्तानला 26.48 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज फेडायचे आहे. या कालावधीत 3.86 अब्ज अमेरिकी डाॅलर्स व्याज खर्च म्हणून भरावे लागणार आहेत. पाकिस्तानच्या कर्जाची परतफेड आणि व्याजाची देयके 37 महिन्यांच्या कर्ज कालावधीद्वारे नवीनतम सात अब्ज डॉलर्स आयएमएफ विस्तारित निधी सुविधाअंतर्गत पूर्णपणे सुरक्षित आहेत.
मध्यपूर्वेतील बँकांकडूनही कर्ज?
कर्जाचा वाढता बोजा कमी करण्यासाठी पाकिस्तानने मध्य पूर्व भागातील बँकांकडून चार अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्जही मागितले होते. पाकिस्तानने 7 अब्ज डॉलर्सच्या विस्तारित निधी सुविधाकडून ही रक्कम मागितली होती, जी जागतिक नाणेनिधीकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे.