नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर घेवून जाऊन स्वत:ची नाचक्की केल्यानंतर आता पाकिस्तानने आपला मुद्दा परदेशी प्रसारमाध्यमांतून मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील एका वृत्तपत्राने आपल्या वृत्तपत्रातील एका पानावर काश्मीरसंबंधीत एक तथ्यहीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वृत्तपत्राने याद्वारे पाकिस्तानचा मतप्रचार करत असल्याचे म्हटले जात आहे. वृत्तपत्राने यासंबंधी एक पूर्ण पानाची जाहिरात छापली आहे. यामध्ये पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचा प्रचार करण्यात आला असून पाकव्याप्त काश्मीरमधीरमधील ख्रिस्ती, हिंदू धर्मीय यासोबतच शिया आणि अहमदिया मुस्लीमांविरोधात होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आलं आहे.
इंटरनॅशनल ह्यूमॅनिटॅरिअन फाऊंडेशनने ही जाहिरात स्पॉन्सर केली असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. केनया, इंडोनेशिया आणि थायलंडमधून इंटरनॅशनल ह्यूमॅनिटॅरिअन फाऊंडेशन ही संस्था आपले काम पाहते. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये लाखो लोकांवर निर्बंध लादण्यात आले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. परंतु सध्या काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याकडे यामध्ये दुर्लक्ष करण्यात आले आहे. वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत काश्मीरमध्ये पाकिस्तानद्वारे पसरवण्यात येणाऱ्या दहशतवादाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मुद्दे सोडवण्यासाठी पाकिस्तानसोबत कोणतीही चर्चा किंवा मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारल्याचे यामध्ये म्हटले आहे. दहशतवाद आणि चर्चा दोन्ही एकत्र अशक्य असल्याचे भारताने पाकिस्तानला अनेकदा ठणकावून सांगितले आहे परंतु पाकिस्तानकडून यावर प्रतिसाद मिळाला नाही. या जाहिरातीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख आहे. परंतु पाकिस्तानात दहशतवादी समुह कार्यरत असल्याच्या मुद्द्यावर मात्र मौन बाळगण्यात आले आहे.