पाकनेही भारतातील आपल्या दुताला सल्लामसलतीसाठी केले पाचारण

इस्लामाबाद – पुलवामा हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून या पार्श्‍वभूमीवर पाकिस्ताननेही आपल्या दिल्लीतील दुताला सल्लामसलतीसाठी इस्लामाबादेत पाचारण केले आहे. ते पाकिस्तानात किती दिवस राहणार आहेत हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. काहीं दिवसांपुर्वी भारतानेही आपल्या इस्लामाबादेतील दूताला दिल्लीत चर्चेसाठी बोलावून घेतले होते.

या संबंधात माहिती देताना पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मोहंमद फैजल यांनी सांगितले की आज सोमवारी सकाळी आम्ही आमच्या दिल्लीतील सोहेल मेहमुद या राजदूताला येथे बोलावून घेतले आहे. भारताचे विदेश सचिव विजय गोखले यांनी गेल्या शुक्रवारी पाकिस्तानी दूताला विदेश मंत्रालयात बोलावून घेऊन त्यांच्याकडे पुलवामा हल्ल्याच्या घटनेचा निषेध नोंदवला होता. पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध सध्या एकदम ताणले गेले आहेत.

त्यातच दोन्ही देशांनी आपल्या दूतांना एकमेकांच्या देशातून बोलावून घेतल्याने हे वातावरण आणखीनच गंभीर बनले आहे. भारताने पाकिस्तानचा मोस्ट फेव्हरर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला असून पाकिस्तानातून येणाऱ्या मालावर त्यांनी दोनशे टक्के अबकारी कर लागू केला आहे. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याच्या रणनितीचा हा एक भाग मानला जात आहे. तथापी भारताकडू त्यापेक्षाही अधिक कठोर कारवाई केली जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानातही त्या अनुषंगाने वरीष्ठ पातळीवर सल्लामसलती सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)