इस्लामाबाद – मुंबईत झालेल्या 26/11 बॉम्ब हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या हाफिज सईदच्या पाकिस्तानमधील लाहोरमधील जौहर टाऊन येथील अकबर चौकातील घराबाहेर 23 जून रोजी मोठा स्फोट झाला. आता पाकिस्तानने या प्रकरणामध्ये भारतावर आरोप केले आहे. रविवारी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मुईद युसुफ यांनी केलेल्या आरोपांनुसार 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख असणाऱ्या सईदच्या घराबाहेर झालेल्या स्फोटामध्ये एका भारतीय नागरिकाचा हात होता. या हल्ल्यामध्ये भारतीय व्यक्तीचा सामावेश असल्याचा दावा पंजाब पोलिसांचे प्रमुख आणि माहिती मंत्री फवाद चौधरी यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना एनएसए युसुफ यांनी केला आहे. भारताची गुप्तचर यंत्रणा असणाऱ्या रॉशी या व्यक्तीचा संबंध असल्याचेही सांगण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आली, असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली. या चाचण्यानंतरच आम्ही हल्ल्यातील मुख्य दहशतवादी आणि हल्ला घडवून आणणाऱ्यांची ओळख पटवली असल्याचे एनएसए युसुफ यांनी म्हटले आहे. एनएसए युसुफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गुतप्तचर यंत्रणा रॉशी (रिसर्च ऍण्ड ऍनलिसिस विंग) संबंधित या हल्ल्याचा कट रचणारा व्यक्ती असून दुसरा भारतामध्ये आहे, हे तुम्हाला सांगताना आमच्या मनात कोणतीही शंका नाही, असे म्हटले आहे. पण ही व्यक्ती नक्की कोण आहे, याची माहिती युसुफ यांनी दिली नाही. आमच्याकडे हल्ला घडवून आणणाऱ्यांची खोटी नावे, खरी ओळखपत्रे आणि माहिती आहे, असेही युसुफ म्हणाले. पंतप्रधान इम्रान खान यांनी या पत्रकार परिषदेनंतर ट्विटरवरून, या बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी आज देशाला यासंदर्भातील तपासाची माहिती देण्याचे निर्देश मीच दिले होते. तसेच देशातील नागरिक आणि लष्कराशीसंबंधित गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय संबंधांची माहिती समोर आली, असे इम्रान यांनी म्हटले आहे.