इस्लामाबाद – पाकिस्तानात पुन्हा आज पासून पोलिओ निर्मुलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशातील पाच वर्षाखालील 3 कोटी 96 लाख बालकांना याचा डोस दिला जाणार आहे. पाकिस्तानातील पोलिओ विरोधी मोहीमेला इस्लामिक कट्टरवाद्यांनी वारंवार विरोध केला आहे. या मोहीमेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हत्याही करण्याचा प्रकार तेथे घडला आहे. त्यामुळे या मोहीमेच्या यशस्वीतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. पण पाकिस्तानातील पोलिओ रूग्णांचे प्रमाण वाढू लागल्याचे लक्षात आल्यानंतर आता तेथे पुन्हा ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आरोग्य सेवाविषयावरील विशेष सहायक जफर मिर्झा यांनी सांगितले की आम्ही देशातील प्रत्येक बालकापर्यंत ही लस पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगातील तीन देशांमध्ये अजूनही पोलिओ अस्त्विात आहे त्यात अफगाणिस्तान, नायजेरीया या देशांबरोबरच पाकिस्तानचाही समावेश आहे.
या मोहीमेसाठी आम्ही जिल्हा स्तरावर समन्वय साधून पथके निर्माण केली असून या मोहीमेला जनतेनेही स्वताहून सहकार्य देण्यास पुढे यावे असे आवाहन मिर्झा यांनी केले आहे. या मोहीमेत एकूण 2 लाख 65 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गेल्यावर्षीै पाकिस्तानात पोलिओचे 144 रूग्ण आढळून आले होते. पाकिस्तानसाठी ही लाजीरवाणी बाब आहे असे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते. त्यांनीच या मोहीमेत आता विशेष लक्ष घातले आहे. पोलिओ डोस मुळे वंधत्व येते असा दुष्प्रचार काही इस्लामिक कट्टरपंथीय संघटनांकडून केला जात आहे. त्याचे निराकरण सरकारने केले आहे. पोलिओ कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षा व्यवस्थाही पुरवण्यावर यावेळी सरकारने लक्ष दिले आहे.