पेशावर – पाकिस्तानच्या सीमेवरील सैनिक आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील तालिबानी सुरक्षा रक्षकांनी आज सकाळी एकमेकांवर जोरदार गोळीबार केला. कालच तालिबानी प्रशासनाने दोन्ही देशांदरम्यानची तोरखान सीमा बंद केली होती. या समीमेवर दोन्ही बाजूंकडून तणाव निर्माण झाल्यामुळे ही सीमा बंद करण्यात आली होती. आज सकाळी झालेल्या गोळीबारामध्ये दोन्ही बाजूंकडून कोणत्याही जीवितहानीचे वृत्त मिळालेले नाही.
अफगाणिस्तानच्या रुग्णांना वैध कागदपत्रांशिवाय तोरखान सीमेवरून पाकिस्तानमध्ये उपचारासाठी नेण्यास पाकिस्तानने मनाई केली होती. त्यामुळे ही सीमा ताबडतोब बंद करण्यात आली होती. सीमेवरील तणावासंदर्भात दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा केली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच आज दोन्ही बाजूंकडून गोळीबार झाला, असे स्थानिकांकडून समजले.
या गोळीबारासंदर्भात पाकिस्तानच्या सैन्यदलाकडून किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलेले नाही. मात्र तालिबानी प्रशासनाचा तोरखान सीमेवरील आयुक्त मुल्लाह मुहम्मद सिद्दीक याने पाकिस्तान आपला शब्द पाळत नसल्याने सीमा बंद करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र त्याने या प्रकरणावर अधिक भाष्य करणे टाळले आहे.
अफगाणी नागरिकांनी नांगरहार प्रांताच्या पूर्वेकडील सीमाभागात पुढील सूचना मिळेपर्यंत जाणे टाळावे, अशी सूचनाही सिद्दीक याने केली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान सीमाभागात असाप्रकारे गोळीबाराच्या घटना यापूर्वीही घडून गेल्या आहेत. यामुळे तोरकान आणि चमन सीमा क्रॉसिंग यापूर्वीही बंद केले गेले होते.