ड्रोनने शस्त्रे टाकण्याचा तपास एनआयएकडे

नवी दिल्ली : पाकिस्तानातून पंजाबच्या सीमावर्ती भागातून ड्रोनद्वारे शस्त्रे टाकण्याच्या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे. पंजाब पोलिसांनी नोंदवलेल्या प्राथमिक गुन्ह्याची फेरनोंद एनआयएने केली आहे.

पाकिस्तानच्या पश्‍चिम सीमेवरून शस्त्रे ड्रोनने पाठवण्यात येतात. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकिस्तानस्थित मुस्लीम दहशतवादी संघटना आणि खलिस्तानवादी संघटनांचा यात सहभाग आहे. या बेकायदा शस्त्रांचा वापर पंजाब आणि अन्य राज्यात हिंसाचार घडवण्यासाठी करण्याचा कट असावा, अशी नोंद पंजाब पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात करण्यात आली आहे.

राज्यात पाकिस्तानातील ड्रोनद्वारे शस्त्रे आणि दारूगोळा टाकण्यात येत आहे. त्याची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घ्यावी, अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली होती. पंजाबच्या तरणतारण जिल्ह्यात राजोके गावात पाच एके 47 रायफली, पिस्तूल, सॅटेलाइट फोन, हातबॉम्ब आणि अन्य शस्त्रे सापडली होती. जीपीास यंत्रणा बसवलेल्या ड्रोनमधून ही शस्त्रे पाकिस्तानात बसलेल्या ऑपरेटरकडून टाकण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.