लाहोर – पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून इम्रान खान पायउतार झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळातही बदल केले जाणार आहेत. याचा पहिला फटका इम्रान यांचे जवळचे मीत्र असलेल्या पाक मंडळाचे अध्यक्ष रमीज राजा यांचेही पद जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुळातच राजा यांनी इम्रान यांच्याच विनंतीवरून हे पद हाती घेतले होते व जोपर्यंत इम्रान पंतप्रधानपदी राहतील तोपर्यंत हे पद सांभाळू, असेही राजा यांनी सांगितले होते. हे पद स्वीकारताना राजा यांनी समालोचनाचे सर्व करार रद्द केले होते. वैयक्तिक नुकसान करून त्यांनी हे पद हाती घेतले होते.
राजा यांनी उत्सुक नसतानाही हे पद स्वीकारले होते. त्यानंतर मात्र त्यांनी गांभीर्याने पाक मंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आयसीसीकडे काही प्रस्तावही दिले होते. तसेच पाकिस्तान सुपर लीगमध्येही काही बदल करण्याचे निश्चित केले होते. आता त्यांचे पद गेले तर नवी व्यक्ती मंडळासाठी काय करेल असा प्रश्नही निर्माण होत आहे. राजा यांची गच्छंती झाल्यावर त्यांच्या जागी नजम सेठी व शकील शेख यांच्या नावांची चर्चा आहे.