भाजप नेत्याच्या हत्येमागे पाकस्थित लष्कर-ए-तोयबा

 

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील भाजप नेत्याच्या खळबळजनक हत्येमागे पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले. भाजप नेत्यावरील हल्ला पूर्वनियोजित असल्याचेही पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.

बांदीपोरा जिल्ह्यात बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष वासीम अहमद बारी यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये बारी यांच्यासह त्यांचे वडील आणि भाऊ मृत्युमुखी पडले. तो हल्ला घडवणाऱ्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्यामध्ये एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांच्या मागावर आता पोलीस आणि इतर सुरक्षा दले आहेत. बारी यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यासाठी 10 जवान तैनात करण्यात आले होते. मात्र, ते बारी यांच्यासमवेत नसल्याची संधी साधून दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्या पार्श्‍वभूमीवर, बारी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सर्व जवानांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर अटकेचीही कारवाई करण्यात आल्याचे समजते. दहशतवाद्यांनी राजकीय नेत्याची हत्या केल्याने सुरक्षा दले आणखी सतर्क झाली आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.