रावळकोट (पाक व्याप्त जम्मू काश्मीर) – जैश ए मोहंम्मद आणि लष्कर ए तोयबासारख्या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी पाक व्याप्त जम्मू-काश्मीरमधील रावळकोट शहरामध्ये एक रॅली आयोजित केली होती. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. काश्मीर एकता दिवसाच्या औचित्याने आणि गाझामध्ये लष्करी कारवाई करणाऱ्या हमासच्या पाठिंब्यासाठी अल अक्सा फ्लड या नावाने या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
पाक व्याप्त जम्मू काश्मीरमधील शाहिद सबीर स्टेडियममध्ये या सभेचे आयोजन केले गेले होते. सभेमध्ये पाकिस्तान स्थित जैश ए मोहंम्मद आणि लष्कर ए तोयबासारख्या विविध दहशतवादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांनी या संघटनांवर बंदी घातली आहे. या दहशतवादी संघटनांनी उघडपणे रॅली आयोजित करणे हे पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन दिले जाण्याचे आणि भारताविरोधात हिंसाचाराला चिथावणी देण्याचेच एक ठळक उदाहरण मानले जाते आहे.
या सभेसाठी हजर असलेले बहुतेकजण पाक व्याप्त जम्मू काश्मीरमधील नव्हते. ते अनोळखी होते, असे वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दिनांक ५ फेब्रुवारी हा काश्मीर एकता दिन मानला जात असल्याने काश्मीरला पाठिंबा हाच या रॅलीचा मुख्य हेतू होता.
पाकिस्तानचा ढोंगीपणा…
अलीकडेच काश्मीर खोऱ्यातील राजकीय कार्यकर्त्या तस्लीमा अख्तर यांनी पाकिस्तानच्या ढोंगी कारभारावर जोरदार टीका केली होती. दहशतवादाला दिले जाणारे पाठबळ आणि प्रदेशातील अस्थिरतेच्या प्रयत्नांपासून लक्ष हटविण्यासाठी वापरलेला अजेंडा आहे, अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानच्या काश्मीर एकता दिवसाचे वर्णन केले होते. तर जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय कार्यकर्ते, जावेद बेग यांनी ५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या वार्षिक काश्मीर एकता दिनाचा तीव्र निषेध केला आहे आणि याला जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसाठी कोणतेही महत्त्व नसलेला प्रचार कार्यक्रम असल्याचे म्हटले आहे.