‘कारगिल युद्धामध्ये पाक सैन्याकडे ना अन्न होते ना शस्त्रे’

नवाज शरीफ यांचा खुलासा

नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कारगिल युद्धाशी संबंधित अनेक महत्वपूर्ण खुलासे केले आहेत. १९९९ सालचे कारगिल युद्ध पाकिस्तानी सैन्याने नव्हे तर सैन्याच्या काही अधिकाऱ्यांनी सुरु केले होते. यामुळे जगभरात पाकिस्तानचा अपमान झाला, असे पाकिस्तान मुस्लिम लीग (एन)चे नेते नवाज शरीफ यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या संयुक्त विरोधी पक्ष पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंटच्या तिसऱ्या रॅलीला नवाज शरीफ यांनी लंडनमधून संबोधित केले.

नवाज शरीफ म्हणाले कि, कारगिल युद्धाची सुरुवात सैन्याच्या काही अधिकाऱ्यांनी केली होती. त्यांनी देश आणि सैन्याला एका अशा युद्धात सोडले जेथून काहीच हाती लागले नाही. आपल्या सैनिकांना विनाअन्न आणि शस्त्रांशिवाय पहाडांवर पाठवल्याचे मला समजल्यावर खूप वाईट वाटले. यामध्ये आपले अनेक सैनिक मारले गेले. संपूर्ण जगात पाकिस्तानचा अपमान झाला. परंतु, यामधून देशाला काय मिळाले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

नवाज शरीफ म्हणाले कि, कारगिल युद्धामागे हे तेच अधिकारी आहेत ज्यांनी १२ ऑक्टोबर १९९९ साली देशात सत्ता परिवर्तन केले आणि मार्शल लॉ लागू केला. जेणेकरून आपल्या चुका लपवू शकतील आणि शिक्षेपासून बचाव होईल.

माजी लष्कर अधिकारी परवेज मुशर्रफ यांच्यावर निशाणा साधत नवाज शरीफ म्हणाले कि, परवेज मुशर्रफ आणि त्यांच्या लोकांनी वैयक्तिक हितासाठी सैन्याचा वापर केला आणि सैन्याची प्रतिष्ठा संपवली, असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी नवाज शरीफ यांनी त्यांचे जावई सफदर यांच्या अटकेचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची मुलगी मरियम नवाज शरीफ आणि तिचे पती यांच्या खोलीत घुसून त्यांच्या गोपनीयतेचा भंग केला आहे. कोणाच्या आदेशावर असे करण्यात आले? कोणाच्या आदेशावर दरवाजा तोडण्यात आला. जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबतीत माहित नाही तर यामागे कोण आहे?, असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले.

दरम्यान, इम्रान सरकारविरोधात पाकिस्तानमध्ये विरोधी पक्ष एकटवले असून संयुक्तपणे रॅली करत आहेत. यासाठी डेमोक्रेटिक मूवमेंटच्या नावाने आघाडी बनवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.