इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना सरकारने तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती पण त्या मुदतवाढीच्या अधिसूचनेला पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने ब्रेक लावला आहे. ही अधिसूचना कोर्टाने निलंबीत केली आहे. बाजवा हे निर्धारीत मुदतीनुसार येत्या 29 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत पण सरकारने त्यांना तीन वर्षांची मुदतवाढ दिली होती. तशी अधिसुचना काल जारी करण्यात आली होती.
त्या अधिसुचनेला कोर्टात आव्हान दिले गेले होते. केवळ राष्ट्राध्यक्षच लष्करप्रमुखांना मुदतवाढ देऊ शकतात तो अधिकार सरकारला नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला 25 पैकी केवळ 11 मंत्र्यांनीच पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या मुदतवाढीविषयी गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाली आहे. कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे.
दरम्यान ज्या इसमाने ही याचिका दाखल केली आहे त्याने ती नंतर मागे घेण्याचा अर्जही कोर्टात सादर केला आहे. पण हा अर्ज मागे घेण्यासही विरोध करण्यात आला आहे. या साऱ्या घटनांबद्दल लष्कराने मात्र अजून कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.