कुकुडवाड – देवापूर, ता. माण येथे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शंभू महादेव यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात पै. भारत मदने व पै. समाधान पाटील यांच्यात रंगतदार लढत झाली. भारत मदनेने समाधानला अस्मान दाखवत प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे इनाम पटकावले.
या मैदानात प्रथम भारत व समाधान या दोघांनी एकमेकांचा अंदाज घेत सावध पवित्रा घेतला. त्यानंतर डाव-प्रतिडाव सुरू झाले. भारतने एकेरी पट काढण्याचा
प्रयत्न केला, तो समाधानने धुडकावून लावला. त्यानंतर समाधानने पोकळ घिस्सा डाव केला; पण भारतने आतून अंगावर येऊन समाधानला अस्मान दाखवले.
सातारचा विकास सूळ व कुर्डुवाडीचा महारुद्र काळेल यांची दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. त्यांना 75 हजार रुपयांचे इनाम विभागून देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पुण्याच्या जयदीप गायकवाडने आटपाडीच्या तानाजी वीरकरवर मात करून 75 हजारांचे इनाम जिंकले. स्थानिक मल्ल गणेश जाधवने चटकदार कुस्ती करत निमगाव केतकीच्या दादा जाधववर मात केली आहे. गणेशने चौथ्या क्रमांकाच्या 51 हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. पिंपरीचा गणेश कुंकुले व कुर्डुवाडीचा सागर मोटे यांच्यातील पाचव्या क्रमांकाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. त्यांना 41 हजारांचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे.
स्थानिक मल्ल महादेव माने व खुडूसचा आशिष वावरे यांच्यातील सहाव्या क्रमांकाची कुस्तीही बरोबरीत सोडवण्यात येऊन त्यांना 31 हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत स्थानिक मल्ल तुकाराम बुधावलेने आटपाडीच्या योगेश कदमवर मात केली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत खवासपूरच्या विक्रम भोसलेने आटपाडीच्या बाबू तांबवेवर मात केली. या मैदानात अनेक चटकदार कुस्त्या झाल्या.
रावसाहेब मगर, भारत भोसले, निवृत्त मेजर तानाजी बोडरे,पोपट रुपनवर, महालिंग खांडेकर, रावसाहेब कोळपे, सत्यावान दीडवाघ, नवनाथ खांडेकर, आनंदा बाबर, रामदास बाबर, किरण पोळ, विलास रूपनवर, नारायण बाड, शशिकांत गायकवाड, गणेश गायकवाड, विशाल जाधव, नाना जाधव, दिलीप वीरकर, सुभाष काटकर, सुखदेव दीडवाघ, किरण शेंडगे यांनी पंच म्हणून काम पाहिले. परशुराम पवार यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले.