पुणे – मंगळवारी रात्री झोडपल्यानंतर बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, रात्री 9च्या सुमारास तुफानी पावसाने पुणेकरांना जेरीस आणले. नॉनस्टॉप सुरू असलेल्या या पावसाने शहरासह उपनगरांत मोठे नुकसान केले. यात अनेक घरांत पाणी शिरले असून रस्तेदेखील बंद करण्यात आले. तसेच पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने सर्व पंप आणि मोटार नादुरूस्त झाले आहेत.
पद्मावती पंपिंग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या बिबवेवाडी, कोंढवा, मार्केट यार्ड परिसर, धनकवडी, बालाजीनगर, सहकारनगर परिसर आणि सातारा रस्ता परिसर भागांना पाणी पुरवठा होणार नाही. या भागांना दिनांक २७ सप्टेंबरपासून पुढील ५ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल
दरम्यान, अतिवृष्टीमुळे पर्वती केंद्र जलवाहिन्यांना झालेल्या अडथळ्यामुळे आज लालबहादूर शास्त्री रस्ता, लोकमान्य कॉलनी, नवी पेठ, टिळक चौक, पूना हॉस्पिटल, पाठक बाग, राजेंद्रनगर, वैकुंठ स्मशानभूमी, डेक्कन, पुलाचीवाडी, प्रभात रस्ता, या परिसरास पाणीपुरवठा होणार नाही.