विविधा : पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील

-माधव विद्वांस

आशिया खंडातील तसेच महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारणारे पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1901 रोजी श्रीरामपूर तालुक्‍यातील लोणी येथे झाला. त्यांनी सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याला सोडविण्यासाठी 1923 मध्ये “लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी’ची स्थापना केली. जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांनी गावातील पाथरवट-वडार मंडळींना एकत्र आणून “मजूर सहकारी सोसायटी’ची स्थापना केली. इंग्रज सरकारने मुंबई काउंन्सिलमध्ये “तुकडे बंदी आणि तुकडे जोड’ हे विधेयक आणले. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांच्या जमिनी सावकारांच्या घशात जाणार होत्या. अशा वेळी इस्लामपूर येथे शाहू महाराजांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखेपाटील नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसह गेले व शेतकऱ्यांपुढे भाषण देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली.

त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याच प्रश्‍नासाठी पुण्याच्या काउंन्सिल हॉलला वेढा घातला. त्यात विखे पाटील आघाडीवर होते. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड (श्रीरामपूर) येथे 1945 मध्ये “द डेक्‍कन कॅनॉल्स बागायतदार परिषद’ भरली होती. त्यावेळी विखे पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी पद्धतीने साखर कारखाना काढण्याचा प्रस्ताव मांडला.

यावेळी परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी व उपस्थित शेतकऱ्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून विखे पाटील यांच्यावरच जबाबदारी टाकली. त्यांनी 1945 ते 1950 या काळात गावोगाव पायपीट करून भागभांडवल जमविले आणि कारखान्याची मुहूर्तमेढ उभी केली. यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचा एकही पैसा घेतला नाही.

विखेपाटील यांची साखर कारखाना काढण्याच्या कल्पनेची त्यावेळी टिंगल केली गेली. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत विखेपाटील यांनी प्रवरानगर येथे आशियातील शेतकऱ्यांच्या पहिल्या “प्रवरा सहकारी कारखान्या’ची 31 डिसेंबर 1950 रोजी स्थापना केली. यासाठी त्यावेळचे मुंबई राज्याचे वित्त व सहकार मंत्री वैकुंठभाई मेहता यांनी या कारखान्यास शासनाची मान्यता मिळवून देऊन सर्वतोपरीने सहकार्य केले. सुरुवातीची पहिली अकरा वर्षे विखेपाटील यांच्या आग्रहामुळेच

डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी कारखान्याचे अध्यक्षपद भूषविले. त्यावेळी ते स्वतः उपाध्यक्ष म्हणून काम पाहात असत. त्यांनी जिल्ह्यात कुटुंबनियोजनाची योजनाही 1959 पासून राबविली. या योजनेचे फलित म्हणजे 1976 साली ऑक्‍टोबर महिन्यात प्रवरा हॉस्पिटलमध्ये चार दिवस भरविलेल्या कुटुंबनियोजन शिबिरात 6,231 शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या व त्यातून शस्त्रक्रियांचा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याने ते प्रभावित झाले व त्यांनी कर्मवीरांना नगर जिल्ह्यात शैक्षणिक संस्था उभारण्यास पाचारण करून सर्वतोपरीने साहाय्य केले. विखेपाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संचालक व उपाध्यक्ष या पदावरही होते. त्यांच्या कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना 1961 मध्ये “पद्मश्री’हा किताब दिला, तर पुणे विद्यापीठाने “डी. लिट्‌.’ (1978) व राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने “डॉक्‍टर ऑफ सायन्स'(1979) या पदव्या प्रदान केल्या. 27 एप्रिल इ.स. 1980 रोजी लोणी बुद्रुक येथे त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.