नारायणगाव : मोहन ठुसे नेत्र रुग्णालय, डॉ.मनोहर डोळे फाऊंडेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. मनोहर कृष्णाजी डोळे (वय 96) यांचे शुक्रवारी (दि. 6) दुपारी दीड वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. रात्री उशिरा नारायणाव येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मुलगी डॉ. स्वाती दीक्षित, मुलगा डॉ. संजीव डोळे, डॉ. संदीप डोळे, सुन रोहिणी डोळे, डॉ. स्मिता डोळे, नातवंडं असा परिवार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते देशाचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने डॉ. मनोहर डोळे सन्मानीत करण्यात आले होते. डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, मोहन ठुसे नेत्र रुग्णालयाचे संस्थापक विश्वस्त डॉ. मनोहर डोळे गेली 42 वर्षे पुणे, नगर, सातारा, नाशिक व ठाणे जिल्ह्यातील दहा तालुक्यात नेत्र विषयक काम करीत होते.
मनोहर डोळे यांचा जन्म 1928 मध्ये सोलापूर येथे झाला असून शिक्षण दादर येथील छबीलदास मुलांचे हायस्कूल, रमणबाग पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल, बेळगावचे बीनियल स्मिथ हायस्कूल, पुणे येथील टिळक आयुर्वेद महाविद्यालय येथे झाले आहे. डॉ. डोळे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डिलीट पदवी देऊन तर राज्य शासनाने शिवनेरी भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
आजपर्यंत डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण, दुर्गम, वनवासी समाजातील बांधवांचे निस्पृह भावनेने पावणेदोन लाख अंधारलेले डोळे प्रकाशमय केले. गेली 50 वर्षांपासून नेत्र शिबिर, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, असंख्य नेत्र रुग्णांना दृष्टी दान देण्याचे काम डॉ. मनोहर डोळे यांनी केले आहे.