विविधा : डॉ. पां. वा. सुखात्मे

– माधव विद्वांस

कृषितज्ज्ञ, पोषक आहारतज्ज्ञ तसेच संख्याशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्‍यातील बुध येथे 27 जुलै, 1911 रोजी झाला.

सुखात्मे कुटुंब वर्ष 1919 मध्ये पुण्यात आले. मॅट्रिकच्या परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 1932 मध्ये त्यांनी फर्गसन महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची गणितामधील बी.एस्सी. ही पदवी संपादन केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी संख्याशास्त्रात लंडन विद्यापीठाची वर्ष 1936 मध्ये पीएच.डी. पदवी मिळविली. त्यानंतर त्यांनी वर्ष 1939 मध्ये “द्विविभाजित फलन’ (बायपार्टिशनल फंक्‍शन्स) या विषयावर डी.एस्सी. पदवी मिळवली.

बनारस हिंदू विद्यापीठामध्ये त्यांच्या प्रयत्नामुळे सांख्यिकी विभाग सुरू झाला. त्यांनी केलेल्या सांख्यिकीय तंत्रज्ञानामधील संशोधन भारतीय कृषिसंशोधन व हरितक्रांती यासाठी फारच उपयुक्‍त ठरले. भारत हा कृषिप्रधानदेश असल्याने पशुवैद्यक, पशुपालन, सुधारित व संकरित बियाणे निर्मिती इत्यादींशी संबंधित सांख्यिकीमध्येही त्यांनी केलेले संशोधन महत्त्वपूर्ण ठरले आहे. आहारासंबंधीचे त्यांचे “सुखात्मे-मार्गन गृहीतक’ प्रसिद्घ आहे. मानवाला किती अन्न लागते? जागतिक उपासमार कशी मोजायची? या प्रश्‍नांवर सुखात्मे यांनी 1961 मध्ये इंग्लंडमध्ये रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीमध्ये प्रबंध सादर केला.

अन्नातील उष्मांक व प्रथिनांचे प्रमाण आणि पोषण यासंबंधीचे पाश्‍चात्य निकष अयोग्य असल्याचे त्यांनी सिद्ध केले. तसेच भारतातील पारंपरिक शाकाहारी आहारही संतुलित असल्याने तो आहार पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास कुपोषणावर मात करता येते, हे दाखवून दिले होते. त्यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी तयार केलेली पौष्टिक सुकडीचे तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी “सुकडी ही तर फाकडी (सुंदर)’, असे कौतुक केले होते.

त्यांनी कोलकाता येथील “ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजिन’ येथे प्राध्यापक, “महाराष्ट्र असोसिएशन फॉर दि कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (विज्ञानवर्धिनी, महाराष्ट्र)’ येथे जीवसांख्यिकी विभागाचे प्रमुख, पुणे विद्यापीठाच्या ग्रामीण नियोजन विभागाचे प्रमुख, तसेच भारतीय कृषिसंशोधन परिषदेत सांख्यिकी सल्लागार (1940-60) म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शास्त्रीय संस्थांचे सदस्य, अधिछात्र व सल्लागार म्हणून काम केले. रोम येथील संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या अन्न व शेती महामंडळाच्या सांख्यिकी विभागाचे प्रमुख (1952-70) आणि आयोवा स्टेट विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी सेवा केली.

सेवानिवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांनी पुण्याच्या मंडईत “इंदिरा कम्युनिटी किचन’ हा अत्यंत अभिनव व पथदर्शक कार्यक्रम राबवून त्यात दुर्बल घटकांना रोजगार व गरिबांना प्रथिनयुक्‍त आहार 20 ते 25 टक्‍के इतक्‍या स्वस्त दराने पुरवला. जनतेमध्ये आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा त्यांनी प्रसार केला.

खेडी व झोपडपट्टयांतली रोगराई निपटून काढण्यासाठी स्वच्छता व आरोग्य याकडे लक्ष देऊन त्यांचे जीवनमान पालटण्यासाठी त्यांनी पुण्याजवळ किरकटवाडी येथे गावात संडास व मुताऱ्या बांधून देऊन खेडुतांना उघड्यावर घाण करण्यातले धोके समजावून सांगितले. विहिरीत क्‍लोरीन टाकून पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय केली. 28 जानेवारी, 1997 रोजी त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.