मनोहर पर्रीकर यांचा पद्मभूषणने सन्मान
नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानांची घोषणा करण्यात आली. त्यानुसार, अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस या माजी केंद्रीय मंत्र्यांना पद्मविभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे.
पद्मविभूषणने विविध क्षेत्रांमधील एकूण 7 नामवंतांना सन्मानित केले जाणार आहे. त्यामध्ये बॉक्सिंगमधील ऑलिम्पिकपटू मेरी कोम, मॉरिशसचे माजी पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचाही समावेश आहे. माजी केंद्रीयमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह 16 जणांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. पर्रीकर यांना तो सन्मान मरणोत्तर लाभला आहे. पद्मभूषणने गौरवण्यात येणाऱ्यांमध्ये आनंद महिंद्रा आणि वेणू श्रीनिवासन या उद्योगपतींचा समावेश आहे. त्याशिवाय आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, नागालॅंडचे माजी मुख्यमंत्री एस. सी. जमीर, जम्मू-काश्मीरमधील राजकीय नेते मुझफ्फर हुसेन बेग यांनाही पद्मभूषण लाभला आहे.
यावेळी विविध क्षेत्रांमधील 118 नामवंतांना पद्मश्री जाहीर झाला आहे. त्यामध्ये ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्याबरोबरच करण जोहर, एकता कपूर, कंगणा राणावत आणि अदनान सामी या चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश आहे. त्याशिवाय, हिवरे बाजार या आदर्श गावातील सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, टीव्ही कलाकार सरिता जोशी आणि बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांनाही पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. श्रीप्रकाश प्रकाशचंद्र कोठारी यांना पद्मश्री
भारतीय वंशाचे अमेरिकेतील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीप्रकाश प्रकाशचंद्र कोठारी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सध्या व्हाईट हाऊसच्या “सिक्युरिटी ऍन्ड एक्स्चेंज कमिशन’मध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ आणि इकॉनॉमिक ऍन्ड रिस्क ऍनालिसीस विभागाचे संचालक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे. डॉ. कोठारी यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ऍन्ड सायन्सेसमधून अभियांत्रिकीची बी. एस. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी मिळवली आहे. लोवा इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पी.एचडी. संपादन केली. डॉ. कोठारी हे दैनिक प्रभातचे संस्थापक, पत्रमहर्षी वा. रा. कोठारी यांचे नातू असून कोठारी यांच्या कन्या सरोजिनी कोठारी यांचे ते सुपुत्र आहेत.
डॉ. कोठारी हे अमेरिकेतील मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधील स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये अकाउंट आणि फायनान्स या विषयांचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांनी गेली दोन दशके “एमआयटी’मध्ये प्राध्यापक आणि प्रशासकाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. फायनान्शियल रिपोर्टिंग, व्हॅल्युएशन, ऍसेट ऍलोकेशन, इंटरनॅशनल अकाउंटिंग प्रॅक्टिसेस, एक्झिक्युटिव्ह कॉम्पन्सेशन, इन्व्हेस्टमेंट, परफॉर्मन्स आणि डेरिव्हेटिव्हज आदी विषयांवर त्यांचे संशोधन आहे.