बंगळूर, दि.15 -पद्मविभूषण विजेते अवकाश शास्त्रज्ञ प्रा. रोद्दम नरसिंहा यांचे येथील खासगी रूग्णालयात मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि कन्या असा परिवार आहे.
प्रकृती खालावल्याने नरसिंहा यांना 8 डिसेंबरला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी सोमवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. नरसिंहा यांनी अवकाश संशोधन क्षेत्रात स्वत:च्या कार्याचा ठसा उमटवला.
मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पंक्तीतील शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी ओळख मिळवली. त्यांनी डॉ.कलाम यांच्यासमवेत अवकाश तंत्रज्ञान या विषयावर एक पुस्तकही लिहिले. भारताच्या यशस्वी रॉकेट प्रक्षेपण कार्यक्रमात त्यांचा मोलाचा वाटा होता.
प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत ते अनेक वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. नॅशनल एअरोस्पेस लॅबोरटरीज आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्सड् स्टडीजच्या संचालकपदाची त्यांनी जबाबदारी सांभाळली.
नरसिंहा यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना 2013 मध्ये पद्मविभूषण या देशाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी नरसिंहा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.