नवी दिल्ली : यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमधे श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्थान मिळाले आहे. देशबंधू डॉक्टर वजीरा चित्रसेना यांना नृत्यातल्या, तर दिवंगत प्राध्यापक इंद्र दसनायके यांना हिंदी साहित्यातल्या कार्याबद्दल पद्मश्री प्रदान करण्यात आला.
कंदयान आणि ओडिसी नृत्यप्रकारात डॉक्टर चित्रसेना यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. श्रीलंकेचा देशबंधू हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार त्यांना श्रीलंका सरकारने प्रदान केला आहे. दिवंगत प्राध्यापक सदनायके यांनी केलनिया विद्यापीठात हिंदी प्राध्यापिका म्हणून मोठे कर्तृत्व आहे. श्रीलंकेच्या शैक्षणिक संस्थांमधे हिंदीचा प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्रीलंकेत 80 हून अधिक शैक्षणिक संस्थांमधे हिंदी भाषा शिकवली जाते.
तसेच बांगलादेशाचे राजनितीज्ञ दिवंगत सय्यद मुअज़्जम अली तसंच नामवंत संग्रहालयतज्ञ इनामुल हक़ यांना भारत सरकारकडून दिला जाणारा यावर्षीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. सय्यद मुअज्जम अली यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. ते भारतात 2014 पासून बांगलादेशाचे राजदूत म्हणून कार्यरत होते.
गेल्या 30 डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला. अली यांनी 1971 मधे पाकिस्तान सरकारविरुद्ध बंड करुन बांगलादेशाप्रति आपली निष्ठा व्यक्त केली होती. नामवंत वस्तूसंग्रहालय तज्ञ इनाम उल हक यांची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 1936 मधे जन्मलेले हक बांगलादेश राष्ट्रीय वस्तूसंग्रहालयाचे संस्थापक महासंचालक होते.