सिंधुदुर्ग – पणन हंगाम 2020-21मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी भात खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. ही भात खरेदी केंद्रे उद्यापासून सुरू होणार असून भातासाठी 2200 रुपयांचा दर देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी भात खरेदी केंद्रे निश्चित केली आहेत. शेतकऱ्यांकडून भात खरेदीची कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच कुडाळ येथील बजाज राईस मिलने गतवर्षी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून भात खरेदी केले होते. त्यासाठी वेळ लागत होता. बजाज राईस मिलने थेट शेतकऱ्यांमार्फत भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. त्याला देखील मान्यता देण्यात आली आहे. आता बजाज राईस मिलमार्फत खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली असून थेट शेतकऱ्यांकडून भाताची खरेदी करण्यात येणार आहे.