तरवे वाहून गेल्यामुळे भात शेती अडचणीत

पुरंदरच्या दक्षिण भागातील स्थिती : रोपांचा तुटवडा जणवणार

परिंचे – दक्षिण पुरंदरमधील काळदरी, मांढर, धनकवडी, बांदलवाडी परिसरातील भाताचे तरवे (रोपवाटिका) पावसाच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे भात शेती अडचणीत आली आहे. लागवडीच्या काळात मोठ्या प्रमाणात भात रोपांचा तुटवडा जाणवणार आहे. दरम्यान, पांरपरिक पद्धतीने भात लागवड न करता नियंत्रित अंतराने भात लागवड करण्याचे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या काळदरी परिसरात 450 हेक्‍टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. या परिसरात इंद्रायणी वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. चालू वर्षी या परिसरात उन्हाळी पाऊस झाला नसल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पडलेल्या तुरळक पावसावर भात रोपे टाकली गेली. 24 जूनपासून मोठ्या प्रमाणात पावसाला सुरवात झाली.

पावसाचे पाणी भात रोपवाटिकेमध्ये घुसल्याने काही प्रमाणात बियाणे उगवणीपूर्वी वाहून गेले. सतत पाऊस पडत असल्यामुळे रोपांची संख्या देखील कमी झाली आहे. भात लागवडीला येत्या आठ ते दहा दिवसांत सुरवात होईल. शेतकऱ्यांना काही प्रमाणात रोपांची टंचाई भासण्याची शक्‍यता आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने ज्या शेतकऱ्यांनी गादी वाफ्यावर रोपे तयार केली आहेत, त्याची उगवण क्षमता व चांगली रोपे वाहून जाण्याचे प्रमाण कमी असल्याचे कृषी अधिकारी विजय जाधव यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या वतीने या परिसरातील भात रोपांची पाहणी केली असून नियंत्रित अंतरावर भात लागवड केल्यास जास्त क्षेत्रावर लागवड होऊन उत्पादन जास्त घेता येईल. भात लागवड करताना 2515 सेंटिमीटर अंतरावर एका ठिकाणी एक ते दोन रोपांची लागवड करावी. त्यामुळे रोपांची कमतरता भासणार नाही.

– संजय फडतरे, मंडल कृषी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)