माजी आमदार विलास लांडे यांचा घणाघात
पिंपरी – गोपीचंद पडळकर यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली. याबाबत भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पडळकरांवर निशाना साधला असून माफी न मागितल्यास पडळकरांना शहरात पाय ठेऊ देणार नाही, असा इशाराही दिला आहे.
याबाबत काढलेल्या पत्रकात लांडे म्हणाले की, ज्या पडळकरांना लोकांनी निवडणुकीत नाकारले. ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना स्वतःची उंची मोजणे गरजेचे आहे. पडळकरांनी नेते शरद पवार यांची जाहीर माफी मागावी. अन्यथा गोपीचंद पडळकरांना पिंपरी चिंचवड शहरात पाय ठेऊ देणार नाही.
माजी आमदार लांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, खासदार शरद पवारांवर पडळकरांनी जेजुरीत अश्लाघ्य भाषेत टीका केली. त्यावर माजी आमदार लांडे यांनी पडळकरांवर हल्लाबोल करताना पिंपरी चिंचवडमध्ये येऊनच दाखवा, असे आव्हान दिले आहे.
पडळकर ज्या पक्षाचे ते आमदार आहेत त्या पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खासदार शरद पवारांना गुरु मानतात. हे तरी पडळकरांनी ध्यानात घ्यावे. शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही. त्यामुळे हिंमत असेल तर पडळकरांनी पिंपरी चिंचवड मध्ये पाय ठेऊन दाखवावा. त्यांची पळता भुई थोडी करू, असा इशारा माजी आमदार विलास लांडे यांनी दिला आहे.