मुंबई – राज्यात आरक्षणाच्या प्रश्नांवरून धनगर समाज आक्रमक झाला आहे.भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी फेसबुकवर व्हिडियो शेअर करत आरक्षणासाठी येत्या 31 मे रोजी धनगर समाजाने जागर करावा, असं आवाहन केलं आहे.आगामी काळात धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार असल्याचे संकेत वर्तवली जात आहे.
गोपीचंद पडळकर यांनी फेसबुकवरून हे आवाहन केलं आहे. त्यांनी या पोस्टला कॅप्शन दिले आहे की,’३१ मे रोजी देशातील समस्त बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या ताकदीची वज्रमुठ मजूबत करायची आहे. धनगर आरक्षणाचा निर्धार मनाशी पक्का करायचा आहे.
यंदा कोविडमुळे आपल्याला जयंती मोठ्या स्वरूपात साजरी करता येणार नाही. परंतु आपल्या घरातूनच सर्वांनी आपल्या धनगरी पोशाखात अहिल्यामातेला वंदन करून जयंती उत्सव साजरा करायचा आहे. मी चौंडी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करताना फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. त्यावेळी आपण कमेंटमध्ये आपले पारंपारिक पोशाखातील फोटो टाकून आपली ताकद दाखवायची आहे. धनगर आरक्षणाचा जागर करायचा आहे.’
त्या व्हिडियोमध्ये ठाकरे सरकारवर खरमरीत टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून आरक्षणाच्या सर्वच सामाजिक आघाड्यावर महाराष्ट्रात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. झोपी गेलेल्या सरकारला जाग करावं, असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे.