- 550 कर्मचाऱ्यांचा दीड महिन्याचा पगार थकीत
- 13 रुग्णांना डिस्चार्ज, तीन रुग्णांना इतरत्र हलविले
- राहण्यासाठी दिलेली जागा ही सोडण्याच्या सूचना
पिंपरी – कोविड योद्ध्यांचा दीड महिन्याचा पगार न करताच नेहरूनगर (पिंपरी-चिंचवड) येथील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. 15) घेण्यात आला. राज्य सरकारच्या सुचनेनुसार रुग्णालय बंद करण्याची कार्यवाही केली असल्याचे महापालिका वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नसताना रुग्णालयाकडून राहण्याची व्यवस्था केलेले खासगी हॉटेल व अन्य ठिकाण त्यांना सोडण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले होते. त्यांनी याबाबत रुग्णालयाच्या मुख्य व्यवस्थापकांना विचारणा केली. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत ‘पीएमआरडीए’कडे निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांद्वारे नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयाचे ऑगस्टअखेर ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर १ सप्टेंबर २०२० पासून हे रुग्णालय सुरू झाले होते. या जम्बो रुग्णालयासाठी अनेकांनी स्वत:ची पाठ थोपटवून घेतली होती. परंतु त्याच रुग्णालयात रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कोविडयोद्ध्यांना पगार न देताच रुग्णालय बंद करण्यात आले. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील पगारासाठी येथील कोविड योद्ध्यांना आंदोलन करावे लागले होते.
राज्य सरकार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महापालिका यांनी या रुग्णालयाच्या खर्चाचा संयुक्तपणे वाटा उचलला होता. रुग्णालयाची क्षमता 816 खाटा इतकी आहे. रुग्णालयामध्ये सुरुवातीला 600 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यावेळी डॉक्टर, परिचारिका यांच्यासह 800 कर्मचारी काम करीत होते. सध्या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय कर्मचारी, फार्मसी, हाऊसकीपिंग, वॉर्डबॉय, रुग्ण समुपदेशक (एमएसडब्ल्यू), स्टोअर विभाग येथील कर्मचारी असे एकूण 550 जण कार्यरत होते. त्यांचा डिसेंबर महिन्यातील पूर्ण पगार आणि जानेवारी महिन्यातील 15 दिवसांचा पगार अद्याप दिलेला नाही. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले होते. त्यांनी याबाबत रुग्णालयाच्या मुख्य व्यवस्थापिका डॉ. प्रीती व्हिक्टर यांची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारणा केली.
एक दिवस आधी बजावली नोटीस
रुग्णालय बंद करण्याबाबत महापालिकेने किमान सात दिवसांपूर्वी लिखित स्वरुपात रुग्णालय व्यवस्थापनाला कळविणे आवश्यक होते. मात्र, एक दिवसाआधीच नोटीस देऊन उद्यापासून रुग्णालय बंद करा, असे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांसमोर “पुढे काय’ हा प्रश्न निर्माण झाला. रुग्णालयात काम करणारे डॉक्टर व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था पिंपरीतील खासगी रुग्णालयामध्ये करण्यात आलेली होती. तर, परिचारिकांची व्यवस्था हिंजवडीतील होस्टेलमध्ये करण्यात आली होती. बाहेरगावाहून कामानिमित्त पिंपरीत आलेले अधिकारी व कर्मचारी वगळता अन्य लोकांना लगेचच हॉटेल व होस्टेल सोडण्याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालय फेब्रुवारीपर्यंत चालू ठेवण्याचे नियोजन होते. मात्र, तत्पूर्वीच रुग्णालय बंद करण्यात आले.
महापालिकेकडून मिळालेल्या सुचनेनुसार कोविड रुग्णालय बंद करण्याची कार्यवाही केली आहे. रुग्णालयात 16 रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यातील ऑक्सिजनची गरज असलेल्या 3 रुग्णांना ऍटो क्लस्टर रुग्णालयात हलविण्याची कार्यवाही करण्यात आली. बरे झालेल्या 13 रुग्णांना घरी सोडण्यात आले. रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत पीएमआरडीएकडे निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. हा निधी मिळताच पगार करण्यात येईल.
– डॉ. प्रीती व्हिक्टर, मुख्य व्यवस्थापिका, जम्बो कोविड रुग्णालय.
—-
राज्य सरकारकडून मिळालेल्या आदेशानुसार नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे रुग्णालय बंद करण्यामागे अन्य दुसरे कारण नाही.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी महापालिका.