श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या निवडणूक प्रचार शुभारंभ प्रसंगी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता संत श्री शेख मोहम्मद महाराज प्रांगणात जाहीर सभा आयोजित केली आहे. याप्रसंगी अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.
ज्योतिरादित्य सिंधीया हे श्रीगोंदा नगरीचे राजे महादजी शिंदे यांचे वशंज आहेत. श्रीगोंदा तालुक्याविषयी नेहमीच प्रेम राहिल्याने तालुक्यातील युवकांच्या शिक्षणासाठी शिंदे घराण्याने आमदार बबनराव पाचपुते यांनी केलेल्या मागणीनुसार रयत शिक्षण संस्थेला श्रीगोंदा शहर परिसरातील वाडे व ८०० एकर जमीन दान दिली आहे. त्यामुळे शिंदे घराण्याविषयी श्रीगोंदेकरांच्या मनात कायम आदराची भावना आहे.
विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधीया येत आहेत. त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. विक्रम पाचपुते यांनी साध्या पध्दतीने उमेदवारी दाखल केली, मात्र प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यासाठी श्रीगोंदा शहरातून भव्य रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. श्रीगोंदा बसस्थानक ते शनी चौक असा रॅलीचा मार्ग असेल. रॅली व सभेसाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आव्हान तालुकाध्यक्ष नागवडे यांनी केले आहे.