नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना राउज एवेन्यू कोर्ट स्थित सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. चिदंबरम यांच्या वतीने कपिल सिब्बल, तर सीबीआयच्या वतीने तुषार मेहता यांनी कोर्टात युक्तिवाद केला. दरम्यान, सीबीआयने ५ दिवसांच्या रिमांडची मागणी केली आहे. चिदंबरम यांनी कोर्टरूममध्ये कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी बातचीत केली. चिदंबरम यांचा मुलगा कार्तीही कोर्टात हजर आहे.
अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली. इतर आरोपींना समोरासमोर बसून चौकशी करावी लागेल. चिदंबरम तपासात सहकार्य करत नाहीत, असे सीबीआयचे कोर्टात म्हटले आहे. तसेच चिदंबरम यांना वारंवार कागदपत्रे मागूनही त्यांनी दिले नाहीत.
सीबीआयने उच्च न्यायालयाचा आदेश कोर्टाला दिला. सीबीआयने कोर्टाला सांगितले की, “हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला असून या प्रकरणात, अद्याप आरोपपत्र दाखल केलेले नाही. आम्ही प्री-चार्जशीट स्टेजवर आहोत. आम्ही काही कागदपत्रांची वाट पाहत आहोत. आरोपी प्रश्न टाळत आहे त्यामुळे त्यांना कस्टोडियल चौकशीची गरज आहे.”