नवी दिल्ली – युक्रेनमधून बाहेर पडलेल्या निर्वासितांना पोलंड आणि इतर देशांमध्ये मोफत निवारा देण्यात येईल असे ओयो या भारतातील आदरातिथ्य क्षेत्रातील कंपनीने म्हटले आहे. ओयो या कंपनीचा भारतासह विविध देशातील हॉटेलबरोबर सहकार्य करार आहे.
युक्रेन मधून बरेच निर्वासित सध्या पोलांड मध्ये गेले आहेत. पोलंडमधील नागरिकांनी या निर्वासितांचे स्वागत केले आहे. हॉटेल बरोबरच ज्या नागरिकांनी स्वतःची घरे व्यावसायिक पातळीवर होती, ती निर्वासीतांना उपलब्ध केली आहेत. ओयो कंपनीने नागरीकांना देणग्या देण्याचे आवाहन केले आहे.
हा खर्च या देणग्यांतून काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. ओयो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रितेश अग्रवाल यांनी सांगितले की, सध्या युक्रेनमधील बरेच नागरिक अडचणीत असल्यामुळे ते युरोपमध्ये आश्रय घेत आहेत. त्यामध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशांना या हॉटेलमध्ये आणि इतर घरांमध्ये विनामूल्य राहण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. युक्रेनमधील परिस्थिती लवकरच सुधारेल अशी आशा अग्रवाल यांनी व्यक्त केली. तोपर्यंत या नागरिकांना आम्ही शक्य ती सर्व मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.