नवी दिल्ली, दि. 25 – पीएम केअर्स निधीतून देशातल्या 551 सरकारी रुग्णालयांमध्ये पीएसए पद्धतीचे ऑक्सिजन प्लांट उभारण्यास अनुमती देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. या प्लांटच्या उभारणीला पीएम केअर्स फंडाने तत्त्वता मान्यता दिली आहे. हे प्लांट शक्य तितक्या लवकर सुरू व्हावेत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
या प्रकल्पांमुळे आता जिल्हा पातळीवरही ऑक्सिजन मिळणे सुलभ होणार आहे. विविध राज्यांतील जिल्हा मुख्यालयांतील सरकारी रुग्णालयांमध्ये हे ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार आहेत. पीएम केअर्स फंडातून या आधी 201 कोटी रुपये खर्चून पीएसए पद्धतीचे 162 प्लांट उभारण्यास या आधीच मंजुरी देण्यात आली आहे.
रुग्णालयातील ऑक्सिजनची गरज रुग्णालयातील प्लांटमध्येच निर्माण होणाऱ्या ऑक्सिजनमधून भागवावी, अशी या मागची संकल्पना आहे. देशाच्या राजधानातीच ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झालेला असताना देशाच्या अन्य भागातील ऑक्सिजनच्या गरजेकडे कोण लक्ष देणार, असा सवाल उपस्थित करून मोदी सरकारवर गेले काही दिवस सतत टीका केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.