चंदीगड – हरियानात पानीपतहून सीरसाला ऑक्सिजन घेऊन जाणारा एक टॅंकरच मधून गायब झाला आहे. सर्वत्र शोधाशोध करूनही त्याचाही पत्ता न लागल्याने शेवटी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी त्याचा शोध जारी केला आहे.
औषध नियंत्रकांकडेही या प्रकरणात तक्रार नोंदवण्यात आली आहे. बुधवारी पानीपत येथील प्लांटमध्ये या टॅंकरमध्ये लिक्वीड ऑक्सिजन भरण्यात आला. त्यानंतर हा टॅंकर सीरसाकडे रवाना झाला. तथापि, तो सीरसाच्या नियोजित स्थळी पोहचला नाही.
पानिपतहून फरीदाबादला जाणाऱ्या एका ऑक्सिजन टॅंकरच्या बाबतीत अशीच एक घटना बुधवारी घडली होती. त्यावेळी हा टॅंकर दिल्ली सरकारने लुटल्याची माहिती हरियानाचे एक मंत्री अनिल विज यांनी दिली.
त्यांनी म्हटले होते की हा टॅंकर दिल्ली सरकारच्या हद्दीतून जात असताना तो त्या सरकारनेच दुसरीकडे वळवल्याचा आरोप विज यांनी केला होता. तथापि, नव्याने बेपत्ता झालेल्या टॅंकरचा कोणताही मार्ग दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येत नसताना हा टॅंकर मात्र कुठे गायब झाला याचे कोडे मात्र अजून उलगडलेले नाही.