भोसरी, जिजामाता रुग्णालयाचा ऑक्‍सिजन पुरवठा अडचणीत

‘गॅब’ने व्यक्‍त केली असमर्थता; 166 रुग्णांचे प्राण धोक्‍यात येण्याची शक्‍यता

पिंपरी – महापालिकेच्या भोसरी येथील नवीन रुग्णालय आणि पिंपरीतील जिजामाता रुग्णालयाला गॅस पुरवठा करणाऱ्या “गॅब’ या कंपनीला उत्पादक कंपन्यांकडून ऑक्‍सिजन पुरवठा होणे बंद झाल्यामुळे या रुग्णालयातील 166 रुग्णांचे प्राण धोक्‍यात आले आहेत. गॅब’ने लेखी पत्राद्वारे गॅस पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली असून महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त काय यंत्रणा उभारणार यावरच या अडचणीतून मार्ग निघण्याची शक्‍यता आहे. अन्यथा येथील रुग्ण इतरत्र स्थलांतरित करून ही दोन्ही रुग्णालये बंद करण्याची वेळ महापालिकेवर येण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भोसरी येथे नवीन रुग्णालय असून या ठिकाणी सध्या 86 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी दहा रुग्ण हे आयसीयू विभागात उपचार घेत आहेत. तर पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात सध्या 80 रुग्ण उपचाराधीन असून या ठिकाणी देखील 10 रुग्ण आयसीयू विभागात उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण हे ओ 2 बेडवर उपचार घेत आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांना ऑक्‍सिजन देण्यात येत आहे. दोन्ही रुग्णालयांना ऑक्‍सिजन पुरवठा करण्याचे काम “गॅब’ एन्टरप्रायजेस या कंपनीला कंत्राटी तत्त्वावर देण्यात आले आहे.

आतापर्यंत या दोन्ही रुग्णालयाला गॅस पुरवठा करणाऱ्या “गॅब’ या कंपनीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना मंगळवार दि. 20 एप्रिल रोजी लेखी पत्र दिले असून या पत्राद्वारे दोन्ही रुग्णालयांना गॅसचा पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली आहे. गॅस उत्पादित करणाऱ्या कंपन्यांनी पुरवठा करण्यासाठी नकार दर्शविल्यामुळे आम्ही गॅस पुरवठा करू शकणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन्ही रुग्णालयासाठी लिक्विड मेडिकल गॅससाठी आपण इतर पर्याय शोधावेत असेही, या पत्रात म्हटल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. गॅस उत्पादन कंपन्यांनी पुरवठा न केल्यास दोन्ही रुग्णालयातील 166 रुग्णांचे प्राण अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविण्या येत आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांना जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली गॅसचा पुरवठा होत आहे. भोसरी आणि जिजामाता रुग्णालयाच्या गॅस पुरवठ्यासाठी निर्माण झालेली अडचण तात्काळ सोडविण्यासाठी आयुक्तांच्या पातळीवर निर्णय होण्याची गरज आहे. अन्यथा येथील रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करावे लागण्याची शक्‍यता आहे. गॅसच्या प्रश्‍नाबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

ऑक्‍सिजन सिलिंडरचा तुटवडा
गॅब एन्टरप्रायजेसचे प्रशांत दिक्षीत यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ऑक्‍सिजन तयार करण्यासाठी उत्पादक कंपन्यांकडे कच्चा माल पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने या कंपन्यांकडूनच ऑक्‍सिजन सिलिंडरचा पुरवठा कमी प्रमणात होऊ लागला आहे. याची कल्पना आम्ही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्‍त राजेश पाटील व संबंधित यंत्रणेला दिली आहे. त्यानंतर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांनी औद्योगिक वसाहतींमधील ऑक्‍सिजन उत्पादक कंपन्यांना भेट देऊन, आक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सुचना केल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत पुरवठा सुरळीत झालेला नाही.

बेडचा तुटवडा कायम
पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी व महापालिकेच्या रुग्णालयातील सर्वच्या सर्व बेड “फुल्ल’ आहेत. या दोन्ही रुग्णालयातील 166 रुग्ण स्थलांतरित करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात बेडच शिल्लक नसल्याने हे रुग्ण कोठे स्थलांतरित करावयाचे असाही प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यातच दैनंदिन रुग्णांमध्ये कोणतीच कमी येत नसल्याचे करोनाचे संकट अधिकच गंभीर होत चालले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.